Friday, May 27, 2022

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अगोदरचा दिवस…

दरवर्षी पाच डिसेंम्बर दिवस आला की, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अगोदरचा दिवस म्हणजेच ५ डिसेंम्बर १९५६ आणि दुसरा दिवस ६ डिसेंम्बर १९५६ हे दोन्ही दिवस आठवतात,त्या दिवसाबद्दल जे काही वाचले आहे ते डोळ्यासमोर चित्रफिती सारखं फिरू लागतं, बाबासाहेबांचे क्षीण झालेले शरीर डोळ्यासमोर येते, आचार्य अत्रे आणि एस. एम.जोशी यांना संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संदर्भातील पत्रे दुसऱ्याच दिवशी टपालात पडायला हवीत म्हणून बजावणारे बाबासाहेब,मध्यरात्रीची चाहूल होताच दूरवर करोल बागेत राहणाऱ्या नानकचंद रत्तुला घरी जायची अनुमती देण्याअगोदर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची टाईप केलेली प्रस्तावना आणि ती दोन्ही पत्रे तपासण्यासाठी टेबलवर ठेवण्यास सांगणारे बाबासाहेब, आयुष्यभर लोकांचे हक्क,न्याय या साठी लढणारा पहाड आपल्या अंतिम क्षणात ही लोकांचाच विचार करीत काम करीत होता. ६ डिसेंम्बर १९५६ ला बाबासाहेबांची प्राणज्योत मालवली,ज्यांच्या मानवमुक्तीच्या लढ्यामुळे बहिष्कृतांना माणूसपण मिळाले होते ते बाबासाहेबांच्या मृत्यूची बातमी ऐकून हळहळणारी लोकं मी आज ही माझ्या आजूबाजूला अनुभवतो, दिल्लीतील अशोका हॉलच्या भिंती जणू थरथरल्या, सभागृहात नेहरूंसकट सगळ्यांनाच घाम फोडत,गर्जना करणारा संसदपट्टू पुन्हा आता संसदेत दिसणार नव्हता,अहोरात्र त्रास सहन करून, प्रकृतीची तमा न बाळगता आपल्या बुद्धिकौशल्यावर संविधान लिहिणारा,आता त्या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी उरला नव्हता.

ज्या-ज्या ग्रंथाना ह्या महामानवाने स्पर्श केला त्यांची पाने जणू महापरिनिर्वाणाच्या बातमीने फडफडू लागली. कामगारांसाठी/शेतकऱ्यांसाठी दीर्घ आंदोलन करणारा नेता आता येणार नव्हता, हिंदुकोडबिल सारखे समाजपरिवर्तन बिल आता कोणी मांडणार नव्हते, म्हणतात ना, “घार उडे आकाशी,चित्त तिचं पिल्लांपाशी” आपल्या करोडो पिल्लांना चारापाणी भरवणारी,त्यांची काळजी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारी घार आज आकाशातून दिल्ली ते मुंबई प्रवास करत होती,पण आज ती कायमची निद्रावस्थेत गेली होती. बाबासाहेबांचे पार्थिव मुंबईत “राजगृहावर” आले,लाखो लोकांच्या डोळ्यातील अश्रूने राजगृह ही हळहळला. एकीकडे कोट्यवधी शोकाकुल जमाव होता,आणि माईकवरून “बुद्धं सरणं गच्छामि” चे माईकवरून येणारे स्वर जणू अनित्यवाद सांगत होते. एक ८५ वर्षांचा सहकाऱ्याने आपल्या ६५ वर्षाच्या सहकाऱ्याच्या मृतदेहाला कडकडून मिठी मारली, ती ८५ वर्षांची मिठी होती,सीताराम केशव बोले (राव बहाद्दूर बोले) यांची. बाबासाहेबांचे अंतिम दर्शन व्हावे यासाठी कोणी भिंतीवर,उंच कट्यावर तर झाडावर चढले होते, अर्जुन कांबळे नावाचे ५५ वर्षांचे गृहस्थ बाबासाहेबांचा फक्त चेहरा दिसावा म्हणून झाडावर चढले पण झाडाची फांदी मोडली आणि ते खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला,बाबासाहेब १६ डिसेंम्बरला मुंबईत धम्मदीक्षा देणार होते, त्यामुळे त्याच्या तयारीला मुंबईतील कार्यकर्ते लागले होते, बाबासाहेब दिल्लीहून मुंबईला येणार, धम्मदीक्षा देणार आणि जनतेला संबोधणार ह्या विचारात कार्यकर्ते होते, बाबासाहेब मुंबईला आले पण ते स्वतःच्या पायावर किंवा कोणत्या सहकाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून नव्हते आले तर ते आले होते निद्रावस्थेत,करोडो लोकांचा उद्गारकर्ता आज उभा नव्हता तो अंगावर फुलांची चादर ओढून झोपलेला होता, त्यादिवशी चंदनावर निजलेल्या पार्थिव देहाला अग्नी दिली, ती अग्नी काहिकाळाने थंड झाली,परंतु लेकरांच्या अंतःकरणात आग पेटली होती, चिता पेटून विझली पण अनेकांच्या घरात त्या दिवशी चूल पेटलीच नाही. अनेक अनुयायी डबडबलेल्या डोळ्यांनी प्रश्न विचारत होते,”बाबा, आम्ही विश्वासाने कोणाच्या खांद्यावर मान टाकावी???”

#उद्धारकर्त्यास_विनम्र_अभिवादन………

अरविंद वाघमारे यांच्या वॉल वरून साभार ….

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,333FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles